
नांदेड,- खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नांदेड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या खरीप हंगामातील पिकाचा विमा भरण्यासाठी ईफ्फ्को टोकियो या विमा कंपनीची नेमणूक झाली आहे,अद्यापही पीक विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू झाले नसल्यामुळे,शासनाने अध्यादेश काढून पोर्टल सुरू करावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिले आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करूनही दोन ते तीन आठवडे झाले आहेत,जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी सोयाबीन,तूर,उडीद,मुंग या पिकाचा विमा मोठ्या प्रमाणावर पिकविमा कंपनीकडे जोखीम रक्कम भरत असतात या वर्षी सुद्धा आपल्या पिकाचा विमा काढण्यासाठी शेतकरी सीएससी केंद्राकडे चकरा मारत आहेत, परंतु अद्याप पिकविमा पोर्टल बंद असल्यामुळे विमा भरता येत नाही. केंद्र शासनाने पीकविमा पोर्टल सुरु केले नाही तर राज्य शासनानेही पीकविमा संदर्भात अद्याप अध्यादेश GR काढला नाही,यामुळे शेतकरी बांधव संभ्रमात व चिंताग्रस्त आहेत, राज्य शासनाने याबाबत त्वरित अध्यादेश जीआर काढून पिक विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यास सांगावे व सर्वच शेतकऱ्यांना आधार दिलासा द्यावा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे ,कृषी मंत्री दादा भुसे साहेब,कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे भागवत देवसरकर यांनी केली आहे.




