23.5 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home विदर्भ 102 व्या दीक्षान्तसाठी लोकसभा अध्यक्षांना आमंत्रण!

102 व्या दीक्षान्तसाठी लोकसभा अध्यक्षांना आमंत्रण!

0
23

नागपूर दि.१६- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 102 व्या दीक्षान्त समारंभासाठी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यापीठाने नुकतेच पत्र पाठविले असल्याची माहिती आहे. यावर मंगळवारी (ता.21) लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाद्वारे कळविण्यात येईल.

शंभरावा दीक्षान्त समारंभ होण्यास उशीर झाल्याने, विद्यार्थ्यांच्या अडकलेल्या पदव्या मिळाव्या यासाठी लगेच 101 वा दीक्षान्त समारंभ घेण्यात आला. मात्र त्यानंतरही 2013 पर्यंतच्या पदव्यांना मान्यता मिळावी यासाठी विद्यापीठाला 31 ऑगस्टपूर्वी 102 वा दीक्षान्त समारंभ घेणे आवश्‍यक आहे. गेल्या महिन्यातच व्यवस्थापन परिषदेने 102 वा दीक्षान्त समारंभ घेण्यास मंजुरी दिली. त्यानुसार 29 ऑगस्ट समारंभाची तारीख ठरविण्यात आली. त्यासाठी राज्यपाल कार्यालयानेही संमती दिली. आता दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना बोलाविण्यासाठी विद्यापीठाने पत्र पाठविले आहे.