गोंदिया :दि. २३: येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात भारत सरकारद्वारे संचालित ‘डिजिटल इंडिया सप्ताह’निमित्त ई-क्रांती विषयावर भाषण स्पर्धा प्राचार्य योगेश नासरे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. उद््घाटन भूगोल विभागप्रमुख डॉ. रजनी चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आला. अतिथी म्हणून सप्ताह कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. भावेश जसानी, डॉ. मुनेश ठाकरे, डॉ. शारदा महाजन उपस्थित होते. डिजिटल इंडियाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीपर्यंत ऑनलाईन सेवा पोहचावी म्हणून संपूर्ण भारताला इंटरनेटशी जोडणे, असा आहे. आपले दस्तावेज ठिकठिकाणी घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. ई-बॅगद्वारे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक पुस्तके कुठेही डाऊनलोड करून वाचू शकतील. तसेच डिजिटल लॉकरमध्ये महत्त्वपूर्ण कागदपत्रे ऑनलाईन ठेवले जावू शकतात, असे मान्यवरांनी सांगितले. ई-क्रांती भाषण स्पर्धेत मोठय़ा संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यात अकरावीची विद्यार्थिनी नेहा सजनानी प्रथम, बी.ए. तृतीयची नूतन खोब्रागडे द्वितीय व बी.कॉम. प्रथमचे आसिफ अली व मानस जैन यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे निर्णायक म्हणून डॉ. सरिता उदापूरकर, डॉ. विनी ढोमणे, प्रा. शशिकांत चौरे व प्रा. किशोर वासनिक यांनी काम सांभाळले. संचालन डॉ. संजय जगणे यांनी तर आभार प्रा. सुयोग इंगळे यांनी मानले.





