स्कील इंडिया मिशनअंतर्गत नागपूर विभाग गतिमान होणार – विभागीय आयुक्त

0
12

नागपूर दि. २२: स्कील इंडिया मिशनअंतर्गत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात कोणकोणत्या क्षेत्रात कौशल्य विकास आणि त्यानुषंगिक रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करता येईल, तसेच उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ याचा विचार करून उद्योग व्यवसाय व उच्च तंत्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासंबंधी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

स्कील इंडिया मिशन अंतर्गत उद्योग व्यवसाय व रोजगार वाढीसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील, यासंबंधी विचार विनिमय झाला. बैठकीला विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य आनंद बंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थ काणे व गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर डी. चांदेकर, व्हीजन नेक्सटचे प्रमोटर संदीप जोशी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने आदी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ तसेच टाटा कन्सल्टंसी यांच्यामध्ये नियमित व्यवसाय व कौशल्यक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. महाविद्यालयात निवडक प्राध्यापकांना टाटा कन्सल्टंसीकडून रोजगारक्षम विद्यार्थी तयार करण्याकरिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परिसरात काही विशिष्ट कोर्सेस सुरू करून त्याअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळण्यासाठी टाटा कन्सल्टंसी कौशल्य वृद्धी करणार आहे.

रोजगार निर्मिती व व्यवसाय प्रक्रिया पद्धती याविषयी महत्त्वाचे नियोजन व अंमलबजावणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण, गरीबी निर्मूलन क्षेत्रात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदियासह इतर जिल्ह्यात निधी उपलब्ध करून यासारखे छोटे- छोटे उद्योग सुरू करण्यासाठी चालना देण्यात येणार आहे.

ओला कॅबच्या माध्यमातून वाहन चालविण्याचा परवाना, वाहन खरेदी करण्यास मार्गदर्शन व या क्षेत्रात इच्छूक तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. स्कील इंडिया अंतर्गत व्यापक रोजगारक्षम कार्यक्रम राबविण्यासाठी नियोजन व प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी आनंद बंग, संदीप जोशी व दोन्ही विद्यापीठाचे कुलगुरू हे सर्व स्तरावरून समन्वय ठेवून आहेत.