समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे-शिवणकर

0
11

अर्जुनीमोरगाव दि. २३: तालुक्यातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांनी आपल्या विभागातील समस्यांची जाण ठेवून त्या दूर करून समाजहितासाठी शर्तीचे प्रयत्न करावे. विरोधांची भूमिका न अंगिकारता सभागृहात एकीचे प्रदर्शन करून तालुक्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या समन्वयातूनच विकास कामाला गती प्राप्त होईल. मावळल्या सदस्यांच्या अनुभव कथनाने आजी सदस्यांच्या ज्ञानात भर पडून विधायक कार्याला बळ प्राप्त होईल, असा आशावाद नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी व्यक्त केला.
पंचायत समितीच्या सभागृहात सभापती अरविंद शिवणकर यांच्या एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून परिचय मेळावा व सत्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
पंचायत समितीचे मावळते सदस्य व विद्यमान सदस्यांच्या सत्कार व परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित पं.स. सभापती अरविंद शिवणकर होते.या वेळी दर्शनीस्थळी नवनिर्वाचित उपसभापती आशा झिलपे, मावळते सभापती तानेश ताराम, मावळते उपसभापती अँड. पोमेश्‍वर रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. पं.स. सभापती अरविंद शिवणकर म्हणाले की, ज्या विश्‍वासाने जनतेने आपल्याला निवडून दिले त्यांचा विश्‍वासघात होणार नाही, याची दक्षता घेणे सदस्यांना क्रमप्राप्त आहे.शासनाच्या विविध योजना आपल्या गावात कशा कार्यान्वित होतील यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक पं.स. सदस्याने जागरूक राहणे गरजेचे आहे. विविध विभागात बर्‍याच जागा रिक्त आहेत. त्या जागा त्वरित भरण्यासाठी पाठपुरावा करून शर्तीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यानंतर मावळते सभापती तानेश ताराम, माजी उपसभापती पोमेश रामटेके, माजी पं.स. सदस्य किशोर तरोणे, दिनदयाल डोंगरवार, माणिक घनाडे, प्रमोद पाऊलझगडे, महादेव बोरकर, जागेश्‍वर भोगारे, अल्का बांबोळे, रत्नमाला राऊत तसेच विद्यमान पं.स. सदस्य नाना मेश्राम, जनार्दन काळसर्पे, होमराज कोरेड्डी, प्रेमलाल गेडाम, शिशुकला हलमारे, करूना नांदगावे, नाजुका कुंभरे, पिंगला ब्राम्हणकर, जयश्री पंधरे, सुधीर साधवानी, रामलाल मुंगनकर, अर्चना राऊत, उपसभापती आशा झिलपे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रभारी खंड विकास अधिकारी डॉ. नरेश कापगते, अभियंता एस.बी. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम आदी मान्यवर उपस्थित होते.