सरपंचपतीने दिली ग्रामपंचायत सदस्याला जातीवाचक शिवीगाळ

0
140
  • 6 जणाविरुद्ध पोलिसात तक्रार, गुन्हा दाखल  

तिरोडा, दि.19 : ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करणार्‍या सरपंच महिलेच्या पतीला विरोध केला, यासाठी त्या सरपंचपतीने ग्रामपंचायत सदस्याला जातीवाचक शिवीगाळ दिली. तसेच जेसीबीने खड्डा खोदून त्यात गाडून मारून टाकण्याची धमकी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी दिली. त्यातच सरपंचपतीच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनीही ग्रामपंचायत सदस्याला जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले.

हा प्रकार मंगळवार, 17 ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्राम बोपेसर येथे घडला. यात सरपंचपतीसह सहा जणांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. यात सरपंचपती तिरूपती हेमराज राणे, मदन नामाजी राणे, खुमेंद्र धनराज राणे, हेमराज काशीराम राणे, राजेश अशोक राणे व संतोष अशोक राणे यांचा समावेश आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपासात घेतले आहे. चंद्रकुमार भाऊदास बिंझाडे रा. बोपेसर असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे.

चंद्रकुमार बिंझाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते 2021 पासून ग्रामपंचायत सदस्य आहेत. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता ते नवीन अंगणवाडी इमारतीची जागा नियुक्त करण्यासंबंधाने उपसरपंच घनश्याम चंदूलाल पटले, ग्रामपंचायत सदस्य योगीराज हरिराम पटले व शाळा समितीचे अध्यक्ष सुनील मारुती भेलावे यांना बोलावून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेले. त्यावेळी तेथे उपसरपंच यांच्यासोबत सरपंच रुपेश्वरी तिरुपती राणे यांचे पती तिरूपती हेमराज राणे होते.

तिरूपती राणे ग्रामपंचायतमध्ये येत असताना ग्रामपंचायत सदस्य बिंझाडे यांनी त्याला अंगणवाडी इमारतीबाबत चर्चा करीत असल्याने बाहेर थांबण्यास सांगितले. मात्र त्यांचे न ऐकता सरपंचपती ग्रामपंचायत कार्यालयात आला. तसेच ग्रामपंचायत सदस्य बिंझाडे यांना जोरजोरात जातीवाचक शिवीगाळ देवू लागला. शिवाय जेसीबीने खड्डा खोडून त्यात गाडून टाकून जीवनिशी ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली.

त्यावेळी सरपंचपतीच्या कुटुंबातील मदन नामाजी राणे, खुमेंद्र धनराज राणे, हेमराज काशीराम राणे, राजेश अशोक राणे व संतोष अशोक राणे हे त्या ठिकाणी आले. या सर्वांनी सुद्धा बिंझाडे हे अनुसूचीत जातीचे असल्याचे माहीत असूनही जातीवाचक शिवीगाळ दिली. तसेच मारण्यापिटण्याची धमकी दिली. शिवीगाळचा आवाज व गोंगाट ऐकून सुखदेव कारू सोनवाने, जयप्रकाश उरकुडा पटले, प्रदीप देवीलाल पटले, उमेश दिवान पटले, धनराज बालचंद रहांगडाले व इतर लोक त्या ठिकाणी जमा झाले होते.

यापूर्वीही सरपंचपतीने दिली होती जातीवाचक शिवीगाळ व धमकी

सदर घटनेच्या आठ दिवसांपूर्वी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ सीमेंट रस्ता बांधकाम सुरू होते. ते काम बरोबर नसल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य बिंझाडे हे कंत्राटदार तुळशी धानू बिंझाडे यांच्याशी बोलत होते. त्यावेळी आधीपासून तेथे उपस्थित असलेला सरपंचपती तिरूपती हेमराज राणे याने तू काम थांबवायला आला, असे बोलून जातीवाचक शिवीगाळ दिली होती. जेसीबीने गाडून टाकण्याची धमकीही दिली होती. पण त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य बिंझाडे यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. तसेच सरपंचपतीच्या धमक्यांच्या भीतीमुळे बिंझाडे हे 13 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत जावू शकले नाही.सदर प्रकरणात तिरोडा पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकुमार बिंझाडे यांच्या तक्रारीवरून अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव करीत आहेत.