अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत आर्थिक अनियमितता, बँक ईडीच्या रडारवर

0
24

अमरावती, 19 ऑगस्ट : राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक (District Bank) आता ईडीच्या (ED) रडारवर आली आहे. विदर्भातील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Amaravati District Central Cooperative Bank) आर्थिक अनियमितता झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आता ईडीने दखल घेत बँकेला नोटीस बजावली असल्याची माहिती समोर येत आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सक्तवसुली संचालनाच्या अर्थात ईडीच्या रडारवर बँक आली आहे. ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागितली असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत विनाविलंब मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल पाठविण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहे.

अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असतांना दलाली देने बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता यात थेट ईडीने दखल घेतल्याने खळबळ उडाली आहे. भाजप आमदार प्रताप अडसड यांनी सातत्याने बॅंके विरुद्ध रान पेटवत यात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आता ईडीच्या पत्रांने स्थानिक प्रशासन व बँकेच्या माजी पदाधिकारी व संचालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे