विनयभंग करणार्‍या आरोपीस एक वर्षाचा कारावास

0
87

गोंदिया, दि.9 : कर्मचारी महिलेच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच त्यांचा विनयभंग करणार्‍या आरोपीस गोंदिया सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.ए.आर. ओटी सो यांनी एक वर्षाचा कारावास व 200 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंड न भरल्यास 15 दिवस अतिरिक्त कारावास सुनावला आहे.

सविस्तर वृत्त असे की, महिला फिर्यादी या 5 डिसेंबर 2020 रोजी रेल्वे स्टेशन अर्जुनी-मोरगाव येथे सरकारी कर्तव्य बजावत होत्या. दरम्यान आरोपी नामे लोकेश अशोक लांडे (वय 40) रा. अर्जुनी-मोरगाव याने फिर्यादी महिलेच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग केला. त्यांच्या लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरगाव येथे शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची हद्द ही रेल्वे पोलीस स्टेशन गोंदियाची येत असल्याने संबंधित कागदपत्र वर्ग करण्यात आले. पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांच्या आदेशान्वये रेल्वे पोलीस स्टेशन गोंदिया येथे अपराध क्रमांक 66/2020 भादंविच्या कलम 353, 354, 323, 332, 448 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांना देण्यात आलेला होता. गुन्हा तपासात घेऊन त्यांनी स्टॉपच्या मदतीने या गुन्ह्यातील आरोपी लोकेश अशोक लांडे यास त्याचे नातेवाईक रा. लाखांदूर, जिल्हा भंडारा येथून गुन्हा दाखल होण्याच्या 24 तासांच्या आत शोध घेतला. तसेच नमूद गुन्ह्यात अटक करून नागपूरच्या रेल्वे कोर्टात हजार केले. आरोपीला मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे एमसीआर रिमांडवर दाखल करण्यात आले. तेव्हापासून आरोपी मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे बंदिस्त होता.

अशी सुनावली शिक्षा : एक वर्षाचा कारावास 

आरोपीविरुद्ध तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी योग्य तपास केला. शिवाय मुदतीच्या आत रेल्वे कोर्ट नागपूर येथे दोषारोपपत्र दाखल केले. सदर गुन्ह्याची पुढील कार्यवाही सत्र न्यायालय गोंदिया येथे झाली. गोंदियाचे सत्र न्यायाधीश एस.ए.आर. ओटी सो यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता महेश चांदवानी, महेश चुटे यांनी योग्य बाजू मांडली. कार्यवाही दरम्यान साक्षी पुरावे व इतर पुरावे यांचेवरून नमूद आरोपीने गुन्हा केला, हे सिद्ध झाले.त्यावरून न्यायाधीश सो यांनी आरोपीस एक वर्षाचा कारावास सक्तमजुरी व 200 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार किशोर ईश्वर, महिला पोलीस नाईक माने, पोलीस नायक चंद्रकांत भोयर, सेलोटे, पोलीस शिपाई नंदकिशोर नारनवरे, अखिलेश राय आदींनी केली.