हुंड्यासाठी लग्न मोडणार्‍या अभियंत्यावर गुन्हा

0
70

लाखनीPहिंदू संस्कृतीत विवाह पवित्र संस्कार मानला जातो. त्यामुळे २ भिन्न कुळातील कुटुंबात नातेसंबंध निर्माण होतात. पण यात काही स्वार्थी प्रवृत्तीचा उदय होऊन हुंडा पद्धतीचा शिरकाव झाल्याने देवाण-घेवाणवरून लग्न समारंभ मोडल्याच्या घटना घडतात. असाच प्रकार लाखनी येथे उघडकीस आला. वराची २ तोळे सोने व ट्रॅव्हल्स खर्चाची मागणी वधू पित्याने धुडकावल्यामुळे नियोजित दिवशी वरात न आल्याने विवाह समारंभ पार पडला नाही. वधू पित्याच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव राजेंद्र वामनराव शिंदे (४५)रा. केळकर वाडी शिवाजी पुतळ्याजवळ, वर्धा असे आहे.
महावितरण कंपनीत अभियंता असलेल्या राजेंद्र शिंदे याचा लाखनी येथील राणी (बदललेले नाव) हिचेशी रितीरिवाजानुसार विवाह निश्‍चित करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी साक्षगंधाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. वर आणि वधू पक्षाकडील मंडळींच्या संमतीने १६ सप्टेंबर रोजी विवाह मुहूर्त ठरविण्यात आला. महिनाभराचा कालावधी शिल्लक असल्यामुळे वधू पक्षाकडील मंडळींनी मंगल कार्यालय बुक करणे, कापड दागदागिने खरेदी करणे, आवश्यक सामानाची जुळवाजुळव करणे सुरू केले. या लग्न कार्यामुळे वधू पक्षाकडील मंडळी खुश होती. प्रतिष्ठेप्रमाणे विवाह समारंभाची तयारी सुरू असताना ८ सप्टेंबर रोजी वराचा वधूपित्याकडे निरोप आला. त्यात २ तोळे सोन्याचा गोप आणि वर्धा ते लाखनी प्रवसाकरिता २ ट्रॅव्हल्सचा जाण्यायेण्याच्या खर्चाची हुंडा स्वरूप मागणी करण्यात आली. वधूपित्याने हुंड्याची मागणी अमान्य केल्यामुळे लग्नाच्या दिवशी वरात आलीच नाही. त्यामुळे विवाह समारंभ झाला नाही. त्यामुळे आनंदाचे वातावरण दु:खात परिवर्तित झाले.
हुंडा ही समाजास लागलेली कीड असून यामुळे अनेक उपवर तरुणींचे आयुष्य बरबाद झाले आहे. हुंड्यासाठी लग्न मोडणार्‍या अभियंत्यांस अद्दल घडावी. तथा दुसर्‍या युवतीशी असा प्रकार घडू नये. असा वधू पित्याने निर्णय घेऊन लाखनी पोलिस ठाणे गाठले व हुंडा मागल्याची फिर्याद दाखल केली. हुंडा मागणे आणि देणे कायद्याने गुन्हा असल्यामुळे लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २११/२0२१ हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ चे कलम ३ , ४ भादवी अन्वये राजेंद्र वामनराव शिंदे रा. केळकर वाडी शिवाजी पुतळ्याजवळ वर्धा याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाणेदार मनोज वाढीवे यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक गौरी उईके तपास करीत असून वृत्त लिहीपयर्ंत आरोपीस अटक केली गेली नव्हती.