21 वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारा आरोपी अटकेत

0
85

नागपूर, दि.20 : वारंवार राहण्याचे ठिकाण बदलवून मागील 21 वर्षांपासून पोलिसांना चकमा देणार्‍या आरोपीस अखेर अटक करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांनी सोमवार, 20 सप्टेंबर रोजी केली.

सविस्तर वृत्त असे की, रेल्वे पोलीस ठाणे नागपूरच्या गुन्ह्यातील व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी रेल्वे कोर्ट नागपूर यांच्या केस क्रमांक 57/2000 कलम 394, 34 भादंविमध्ये तीन आरोपी मागील 21 वर्षांपासून फरार होते. त्यातील आरोपी मोहम्मद अशफाक उर्फ बिट्टू जुबर अहमद अंसारी (वय 39) रा. सैफीनगर मोमीनपुरा नागपूर हा नेहमी राहण्याचे ठिकाण बदलवून पोलिसांना चकमा देत होता. त्यामुळे गुन्हे शाखा आरोपीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होती. यात आज सोमवार, 20 सप्टेंबर रोजी सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील कारवाईसाठी त्याला रेल्वे पोलीस ठाणे नागपूरच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सेच सदर गुन्ह्यातील दूसरा आरोपी मोहम्मद शाकिल मोहम्मद खलील रा. मोतीबाग नागपूर याचा शोध घेण्यात आला. मात्र तो सन 2011 मध्ये मरण पावल्याचे समजले. तसे मृत्यू प्रमाणपत्र नागपूर महानगर पालिकेमधून प्राप्त झाले आहे. तसेच तिसर्‍या फरार आरोपीचा शोध घेवून योग्य कार्यवाही करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.

सदर कारवाई लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस नायक इंगळे, उजवणे, पाली, पोलीस शिपाई हिंगणे, मदनकर, रोशन अली, वाहन चालक भनारकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक ठाकुर व पोलीस शिपाई तितिरमारे यांनी केली.