वाळू तस्करांनी एसडीओंच्या वाहनाच्या काचा फोडल्या; रवींद्र राठोड जखमी

0
34
file photo

भंडारा : कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एसडीओ) पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील बेटाळा येथे आज पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली.वाळू माफियांनी  वाहनाच्या काचा फोडल्या. यात एसडीओ रवींद्र राठोड जखमी झाले आहेत. या प्रकरणाची पवनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भंडारा उपविभागीय अधिकारी (SDO) रवींद्र राठोड यांच्याकडे रेती तस्करीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून आज पहाटे ते तलाठी, पोलीस कर्मचारी असलेल्या पथकासह पवनी निलज रस्त्यावर आपल्या वाहनाने गेले. पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास रेतीचे चार-पाच टिप्पर एकापाठोपाठ येताना दिसले. त्यांनी टिप्परला थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर बेटाळाजवळ पथकाने टिप्पर अडविला. काही कळायच्या आता 15 ते 20 तस्करांनी हातात काठ्या व दगड घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात उपविभागीय अधिकारी राठोड जखमी झाले असून वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.वाळू माफियांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परवा परवा तहसीलदारांवर हल्ला करणाऱ्या तस्करांनी आज थेट उपविभागीय अधिकाऱ्यांवरच हल्ला केला. आजच्या घटनेमुळे महसूल मंत्रालय वाळू तस्करीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहने नेण्यासही तस्कर घाबरत नाहीत. त्यामुळे यांच्यात येवढी हिंमत येते कुठून, हा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.या प्रकाराची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले खरे, मात्र तोपर्यंत तस्कर पसार झाले होते. लागलीच पवनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली असून एसडीओ राठोड यांना पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथे उल्लेखनीय म्हणजे लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरात दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या पथकांवर रेती तस्करांनी लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. होता. त्यात दोन तस्करांना अटकही करण्यात आली होती. आता थेट एसडीओंच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याने या घटनेने महसूल प्रशासनासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.