कोल्हापुरात पुन्हा बोगस डॉक्टरांचं कांड उघड!

0
8

चौघांना अटक तर 6 जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर:-पुरोगामी कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कोल्हापूर पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्त छापे टाकले. यामध्ये राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात गर्भलिंग चाचण्या होत असल्याचे उघड झाले असून चार जणांना अटक तर एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे.या संदर्भात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. मडीलगे येथील विजय केळुस्कर आणि राधानगरीतील श्रीमंत पाटील हे दोघे बोगस डॉक्टर हे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून सोनोग्राफी मशीनसह गर्भपाताची औषधे जप्त करण्यात आली आहेत.या कारवाईनंतर कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

यापूर्वीही कोल्हापुरात बोगस डॉक्टरांवर कारवाई

मागील वर्षात एप्रिल (2022) महिन्यात पोलीस, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करुन बेकायदेशीर गर्भपात आणि लिंग निदान करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून दोघां डॉक्टरांसह तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात गर्भलिंग चाचणी आणि स्त्री भ्रूण हत्या होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी या केंद्राचा छडा लावण्याचा आदेश आरोग्य विभागाला दिला.तसेच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही या गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर डॉक्टर आणि पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन सुरू केले.

स्टींग ऑपरेशन करत ठोकल्या बेड्या

डॉ. वेदक, पोलीस अधिकारी आमले आणि गीता हासूरकर यांनी रुपालीचे नातेवाईक असल्याचे सांगितले. बोगस डॉक्टर नाईकला कर्नाटकातील रिपोर्ट दाखवले.तसेच गर्भपातासाठी लागणारी रक्कम दिली. त्यानंतर हर्षल नाईक याने करंजफेण येथील बोगस डॉक्टर उमेश लक्ष्मण पोवार (वय 46, रा.करंजफेण ता. शाहूवाडी सध्या राहणार हरिओमनगर अंबाई टँक रंकाळा परिसर कोल्हापूर) हा गर्भपात करतो असे सांगून त्याच्याशी संपर्क साधाला. दोघांची चर्चा झाल्यानंतर गर्भपात करण्यासाठी औषधाच्या गोळ्या ठेवाव्या लागतील नाईक याने सांगितले. बोगस डॉक्टर उमेश पोवार याने गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या घेण्यासाठी त्यांना रंकाळा परिसरात बोलावले. त्यानंतर टीमने त्याला तिथे पकडले.