Home गुन्हेवार्ता मारहाण करुन कॅमेरा चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात

मारहाण करुन कॅमेरा चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात

0
5

सालेकसा,दि.२५ -तालुक्यातील कोटरा डॅमवर 21 मे रोजी गोंदिया येथील फोटोग्राफर व त्याच्या मित्रांना मारहाण करुन चार अज्ञात व्यक्तींनी जबरी चोरी केली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस व सालेकसा पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना अटक करुन 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गोंदियातील गौतमनगर येथील फोटोग्राफर विक्की राधेलाल उके (25) व त्याचे दोन मित्र सायंकाळच्या सुमारास कोटरा डॅमवर फोटोशूट करीत होते. यावेळी चार अज्ञात व्यक्ती चेहर्‍यावर रुमाल बांधून आले व लाठीकाठीने मारहाण करुन विक्की उके याच्याजवळील निकॉन कंपनीचा कॅमेरा व मित्र साहिल डोये याच्या मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी 22 मे रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथक व सालेकसा पोलिसांनी चार आरोपींना शहरातील गोविंदपूर येथून अटक केली व त्यांच्याजवळून जबरी चोरी केलेला 80 हजार रुपयाचा कॅमेरा व 50 हजाराची दुचाकी असे साहित्य जप्त केले. हर्ष विनोद गेडाम (21), मंगेश गणेश खडसे (22) व हर्ष जितेंद्र वैद्य (19) तिन्ही रा. गोविंदपूर आणि साहिल गजानन डोये (18) रा. जवरी अशी आरोपींची नाव आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपींना सालेकसा पोलिसांना सुपूर्द करण्यात आले.