श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर शासनाच्या ताब्यातच हवे

0
12

पंढरपूर – खासदार सुब्रमण्यम स्वामी यापूर्वी कधीही विठोबाच्या दर्शनाला आले नाहीत. त्यांना विठोबा माहितीसुद्धा नाही. त्यांना विठ्ठल मंदिर सरकारच्या नियंत्रणातून काढून कुणाच्या तरी ताब्यात द्यायचे आहे. विठ्ठलाच्या मंदिरात पूर्वीची पद्धती लागू होणार असेल, तर महाराष्ट्रातील वारकरी हा बदल सहन करणार नाही. ते सुप्रीम कोर्टात जायच्या तयारीत आहेत. त्यापेक्षा जनतेचे कोर्ट आहे. आम्ही जनतेसमोर जाऊ. राज्यातील सर्व वारकरी, महाराज मंडळी यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात सभा घेऊ, जनजागृती करू; मात्र श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थेत बदल होऊ देणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.

पंढरपूर येथील संत तुकाराम भवन येथे आयोजित श्री विठोबा-रखुमाई मंदिर मुक्ती दिनाच्या 9 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. गंगाधर महाराज कुरुंदकर, ह.भ.प. भगवान महाराज बागल उपस्थित होते.

यावेळी श्री विठ्ठलाची पूजा पुरुष सूक्ताऐवजी संत तुकाराम महाराजांच्या मंगलाचरण आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानाने व्हावी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची मुदत संपलेली आहे. नूतन समितीची रचना तातडीने करण्यात यावी. व्हीआयपी दर्शन पद्धती बंद करावी. विठ्ठल मंदिरातील संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे सुशोभीकरण करण्यात यावे. मंदिर समिती कर्मचाऱयांना शासन निर्णयानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता देण्यात यावा. माउलींच्या भेटीसाठी आळंदीला जाणाऱ्या पालखी सोहळ्याचा मान वारकरी संप्रदायातील सर्व फडांना मिळाला पाहिजे, असे ठराव यावेळी करण्यात आले.दरम्यान, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरीत येऊन सुप्रीम कोर्ट, वारकरी यांच्याविषयी अविश्वास दाखवला आहे. तसेच, न्यायालयाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला.