वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या दोघांना अटक

0
16

अड्याळ-जंगलात विजेचा शॉक देऊन वन्यप्राण्यांची शिकार करणार्‍या दोघांना वन विभागाने अटक केली. ही कारवाई पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रातील चालना बीटमध्ये रविवारी सायंकाळी करण्यात आली. यातील एक जण पसार झाला.
संदीप पुरुषोत्तम फुलसुंगत (२९), दुलीचंद सरदार किन्नाके (३२) दोघे रा.खुश्रीपार असे अटकेतील आरोपींची नावे असून भाऊराव रामचंद्र फुलसुंगे हा पसार झाला आहे. अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत चालना बीटमधील कक्ष क्र.२९१ मध्ये वनकर्मचारी रविवारी गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना लोखंडी तार व बांबूच्या खुंट्या दिसून आल्या. त्यांनी हा प्रकार आपल्या वरिष्ठांना कळविला. सायंकाळी याठिकाणी शिकारी येथील म्हणून वनकर्मचारी दबा धरुन बसले. सायंकाळी तिघे जण तारांना वीजप्रवाह जोडण्यासाठी आले. त्यावेळी दबा धरुन असलेल्या वनकर्मचार्‍यांनी तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघेही पळून जाऊ लागले. मात्र, वनकर्मचार्‍यांनी पाठलाग करुन संदीप आणि दुलीचंद या दोघांना अटक केली. त्या दोघांना वन अधिकार्‍यांसमोर हजर केले. त्यांच्याविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल गवई, सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ढोबळे, मिथुन तरोणे यांनी केली. पसार आरोपीचा शोध सुरु आहे.