रेती तस्करीचे पाच ट्रक जप्त

0
30

चिमूर,दि.01ः- शंकरपूर पोलिस मदत केंद्र तथा महसूल विभागाला कान्पा-शंकरपूर-भिसी मार्गाने नागपूरला हायवा ट्रकने अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून दोन्ही विभागाकडून रविवारी रात्री संयुक्त कारवाई करीत विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारे नागपूर जिल्ह्य़ातील पाच ट्रक हस्तगत करण्यात आले.
चिमूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि विक्री सुरू आहे. रात्रीच चालणार्‍या या खेळात अनेक राजकीय नेते तथा वरदहस्त लाभलेले कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तालुक्यातील गावालगत तथा जंगलातील नदी नाल्यातील रेती उत्खनन सुरू आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगेच्या पात्रातूनही रेती उत्खनन करून तालुक्यातुन वाहतूक बिनदिक्कत होत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
अशाच प्रकारे कान्पावरून शंकरपूर-भिसी मार्गाने नागपूर जिल्ह्य़ात रेती वाहतुक सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, शंकरपूर पोलिस मदत केंद्राला देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद जांभळे, पोलिस हवालदार रायपुरे, नागरगोजे यांच्यासह शंकरपूर बस स्टँड व कान्पा मार्गावरील विना परवाना रेती वाहतूक करणारे ट्रक थांबवून ठेवले.
उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्या मार्गदर्शनात तलाठी प्रवीण ठोंबरे, विलास निखाडे, राजेंद्र नन्नावरे, अनिल वाघमारे घटना स्थळावर पोहोचून पंचनामा केला. त्यात प्रत्येकी ५ ब्रास अवैध रेती आढळली. इनामूुल खान रा.खरबी, नागपूर यांच्या मालकीचे एम.एच.४0 बी.एल. ६५३५, योगेश तिडके रा. वाडी, नागपूर यांचे मालकीचे एम.एच.३४ बी.जी.५५४0, वहिद अन्सारी रा.खरबी, नागपूर यांच्या मालकीचे एम.एच.४0 बी.एल. ४५७६, विक्की मून रा. चाम्पां, नागपूर एम.एच. ४0 बी.एल. ६१२२ तथा शमीम अन्सारी रा.खरबी, नागपूर यांचे मालकीचे एम.एच.५९ ए.टि.५८७९ या क्रमांकाचे ट्रक हस्तगत करून सुरक्षिततेकरिता पोलिस संरक्षणात चिमूर पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले.