कोका मधील वाघाचा मृत्यु विष बाधेमुळे झाल्याचा संशय;संशयित आरोपींना अटक

0
23

शवविच्छेदन अहवाल प्राप्त


        गोंदिया,दि.31 : नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, वनपरिक्षेत्र अधिकारी कोका वन्यजीव अभयारण्यात २६ मार्च रोजी झालेला वाघाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा शवविच्छेदन अहवाल वनविभागाला प्राप्त झाला असून त्यात नमुद केल्याप्रमाणे विष बाधा झाल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेतील दोन आरोपींना अटकही करण्यात आल्याचे वन विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

        या घटनेचा तपास रोशन राठोड, सहाय्यक वनसंरक्षक (अति.कार्य.) कोका वन्यजीव अभयारण्य व  महादेव माकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोका वन्यजीव अभयारण्य, यांनी करून  २८ मार्च २०२३ रोजी दोन संशयित आरोपीस अटक केली. नरेश गुलाबराव बिसने, वय 54 वर्ष रा. परसोडी, ता. लाखनी जि. भंडारा व मोरेश्वर सेगो शेंदरे, वय 64 वर्ष रा. परसोडी, ता. लाखनी जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींना कोर्ट विद्यमान प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी न्यायालय, लाखनी यांचे न्यायालयात हजर केले असता सदर प्रकरणात अजुन पुढील तपासाकरीता ३१ मार्च २०२३ पर्यंत वन कोठडी सुनावली होती.

        ३० मार्च रोजी वशिष्ठ गोपाल बघेले वय 59 वर्ष रा. खुर्शीपार पो. सालेभाटा, ता. लाखनी जि. भंडारा यांना वन्यप्राणी वाघाचे शिकारी प्रकरणी चौकशी करीता कोका वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. चौकशी दरम्यान असे निदर्शनास आले की, बघेले हे सुध्दा वन्यप्राणी वाघाचे शिकारी प्रकरणी सामील असल्याने त्यांना सुध्दा अटक करण्यात आली असुन, सदर आरोपींकडून नखे- 6 नग हस्तगत करण्यात आले. आता पर्यंत चौकशी दरम्यान एकुण नखे 7 नग, वघारीचे मनक्याची हड्डी-1 नग, एका पायाची हड्डी-1 नग इत्यादी साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. सदर अटक केलेल्या आरोपीस ३१ मार्च २०२३ रोजी  कोर्ट विद्यमान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, लाखनी यांचे समक्ष हजर करण्यात आले आहे.

        सदर प्रकरणात जयरामेगौडा आर, उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया, पवन जेफ, उपसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली, रोशन राठोड, सहाय्यक वनसंरक्षक (अति.कार्य.) कोका वन्यजीव अभयारण्य यांचे मार्गदर्शनात तसेच संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक वनविभाग भंडारा, सचिन नरळ, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे सहकार्याने पुढील तपास व आवश्यक कार्यवाही महादेव माकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोका वन्यजीव अभयारण्य व इतर क्षेत्रीय कर्मचारी करीत आहेत.