शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांना मिळणार शेतकरी असल्याचा दाखला कृषी आयुक्तांचे निर्देश परिपत्रक जारी

0
18


तालुका कृषी अधिकारी देणार दाखला

          गोंदिया,दि.31 :  शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर केंद्र व राज्य शासनाचा भर आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करतेवेळी त्यात महिला शेतकऱ्यांचाही सहभाग राहणे आवश्यक आहे. तथापि राज्यात महिलांच्या नावे जमिनीचा सातबारा असलेल्या महिला शेतकऱ्यांची संख्या अल्प म्हणजे सुमारे १५.४६ टक्के आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठी लागणारा शेतकरी असल्याचा दाखला तालुका कृषी अधिकारी यांनी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे शेती असल्यास त्या कुटुंबातील कोणत्याही अन्य सदस्याला शेतकरी असल्याचा दाखला द्यावा असे निर्देश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. यासंदर्भातील परिपत्रक २९ मार्च २०२३ रोजी कृषी आयुक्तालयाने जारी केले आहे.

          राज्यात ७९.५२ टक्के पेक्षा अधिक शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. अशा परिस्थितीत वैयक्तिक शेतकऱ्यांनी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे गट स्थापन करून गटशेती करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर केंद्र व राज्य शासनाचा भर आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करतेवेळी त्यात महिला शेतकऱ्यांचाही सहभाग राहणे आवश्यक आहे. तथापि राज्यात महिलांच्या नावे जमिनीचा सातबारा असलेल्या महिला शेतकऱ्यांची संख्या अल्प म्हणजे सुमारे १५.४६ टक्के आहे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठी कंपनी निबंधकांकडून शेतकरी असल्याबाबत दाखला मागितला जातो. शेतकरी कुटुंबातील ज्यांच्या नावे शेती नाही अशा महिला अथवा अन्य सदस्यांना शेतकरी म्हणून दाखला मिळण्यात अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठी लागणारा शेतकरी असल्याचा दाखला तालुका कृषी अधिकारी यांनी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे शेती असल्यास त्या कुटुंबातील कोणत्याही अन्य सदस्याला शेतकरी असल्याचा दाखला द्यावा असे परिपत्रक कृषी आयुक्ताने निर्गमीत केले आहे.

           २८ जून २०१७ च्या शासन निर्णय अन्वये कुटुंब म्हणजे पती, पत्नी व १८ वर्षाखालील अपत्यांचा समावेश होतो. असा दाखला केवळ शेतकरी उत्पादक कंपनीचा भाग धारक म्हणून कंपनीत सहभागी होण्यासाठीच राहील असे कृषी आयुक्तालयाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. हे परिपत्रक विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा व तालुका कृषि अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.