स्कूलबसचे स्टेअरिंग तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटी होऊन 25 ते 30 विद्यार्थी जखमी

0
16

जळगाव- जिल्ह्यात मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचे स्टेअरिंग तुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सूटल्याने बस पलटी झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमधून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ हा अपघात झाला. या बसमध्ये सुमारे 40 विद्यार्थी आणि काही शिक्षक होते. यातील अंदाजे 30 विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत.

कसा झाला अपघात?

आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेची बस पहूरवरून विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. यावेळी पाचोरा- शेंदुर्णी रस्त्यावर बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. परिणामी, बसचालकाचे नियंत्रण सूटले व बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खोल खड्ड्यात पडली. तिथे असणाऱ्या झाडाला बसची जोरदार धडक बसली व बस पलटी झाली.

भीतीचे वातावरण

अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र,सुखरुप असल्याने पालक आणि शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे. अपघातामध्ये जखमी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर पहूर, शेंदुर्णी आणि जळगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.