पोलिसांनी कॅम्प केला उद्ध्वस्त; नक्षल्याची मोठी योजना फसली

0
20

गडचिरोली- जिल्ह्याच्या दक्षिण भागात विशेषत: भामरागड व एटापल्ली तालुक्यात मागील काही दिवसांपासून नक्षल्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाने या भागावर अधिक लक्ष ठेवले होते. अशातच नक्षली मोठा घातपाताचा डाव आखित असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर जवानांचे विशेष पथक गस्तीवर होते. दरम्यान उपविभागी हेडरी अंतर्गत येत असलेल्या गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर नक्षली गोळा झाले होते. मात्र वेळीच जवानांनी सदर कॅम्प उध्वस्त करीत एका नक्षलीचा खात्मा केल्याने नक्षल्यांची मोठी योजना फसल्या गेली आहे. यामुळे पुन्हा एकदा नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
एटापल्ली तालुक्यातील उपविभाग हेडरी अंतर्गत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत येणार्‍या गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर ६0 ते ७0 च्या संख्येत असलेल्या नक्षल्यांनी मोठे कॅम्प बसविले होते. यावेळी नक्षल दलमचे मोठे कॅडरही उपस्थित असल्याची माहिती आहे. नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने मोठी योजना आखण्याचा बेत रचणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस दलाला प्राप्त होताच पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वात काल रात्रीपासून विशेष अभियान पथकाचे जवान छत्तीसगड-महाराष्ट्र राज्य सीमलगतच्या नक्षल प्रभावित भागात गस्त घालित होते. जवानांची चाहूल लागताच सकाळी १0 वाजताच्या सुमारास हिक्केर पहाडीवर एकत्र असलेल्या सशस्त्र नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. जवानांनी प्रतिउत्तर दिले, जवळपास १ तास सदर चकमक चालली. यात समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा (३१) रा. तुमरकोडी ता. भामराड या नक्षली दलम कंपंनी क्रमांक १0 च्या सदस्याचा मृतदेह आढळून आला. तसेच घटनास्थळावरुन मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा व नक्षली साहित्यही जप्त करण्यात आले. सी-६0 जवानांनी वेळीच पहाडीवरील नक्षल्यांचा कॅम्प उध्वस्त केल्याने नक्षल्यांचा घातपाताची मोठी योजना उधळून लावण्यात यश आले आहे.
सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सी-६0 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले. तसेच सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

आणखी जखमी नक्षलीची शक्यता : एसपी
हिक्केर जंगल पहाडीवर कंपनी १0 सह इतर दलमचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते. चकमकीनंतर एका नक्षलीचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळावर प्रथमदर्शनी अधिक पाहणी केली असता यात आणखी काही नक्षली जखमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर जंगल परिसरात सी-६0 जवानांचे नक्षल विरोधी अभियान अद्यापही सुरु असून या परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

आंदोलनस्थळापासून अवघ्या ५ किमीवरील घटना
मागील काही दिवसांपासून छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील आदिवासी नागरिकांद्वारे विकास कामांना विरोध करीत तोडगट्टा येथे जनआंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात नक्षलवाद्यांनी नागरीकांना बळजबरीने सहभागी होण्यास भाग पाडल्याचे नक्षल्यांनी नुकताच टाकलेल्या पत्रकातुन सिद्ध झाले होते. हिक्केर जंगल पहाडीवर घडून आलेली चकमक सदर आंदोलन स्थळापासून अवघ्या ५ किमी अंतरावर आले. त्यामुळे सदर आंदोलन कायम ठेवण्यासाठी या परिसरात नक्षल्यांच्या हालचाली सुरु असल्याचे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे.