हरियाणातील पंचकुला येथील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाचा समृद्धी मार्गावर पांढरकवडा येथे अपघात झाला. त्यात पोलीस निरीक्षक रेखा चव्हाण यांचा मृत्यू तर सहायक पोलीस उप निरीक्षक सुखविंदर्सिंग मिठ्ठू जगड़ा, चालक शम्मी कुमार, आरोपी वैद्यनाथ शिंदे हे जखमी झालेत.
जखमींना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फसवणुकीचा गुन्ह्यात आरोपी असलेल्या शिंदे यास नागपूरला नेण्यात येत होते.या पोलीस वाहनाने पुढे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे पोलीस वाहनाचा चेंदामेंदा झाला. सावंगी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. अपघाताची माहिती होताच सावंगी व जाम महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा टोल प्लाझाजवळ नागपूर कॉरिडॉरवर झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार तर चालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने चिमुरडी बचावली.आज संध्याकाळी उशिरा ही दुर्घटना घडली असून जखमीला रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईहून नागपूरकडे जाणारी बीएमडब्ल्यू कार (क्र. डीडी ०१ ए ४१३१) दुभाजकला वेगात धडकल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. कारमधील महिला जागीच ठार झाली तर चालक गंभीर जखमी झाला. तीन वर्षीय बालिका सुदैवाने बचावली. जखमीवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, आईचा मृत्यू झाल्याने चिमुरडीच्या आकांताने रुग्णालयातील कर्मचारी व बचावपथक भावूक झाले होते.





