लाच स्विकारताना जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटीलसह दोघांना अटक

0
28

नाशिक,दि.20 ; आजारपणातून बरे झालेल्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय रजेचे वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्यासह दोन आरोग्य सेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अलीकडेच जिल्हा उपनिबंधकाला ३० लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

वैद्यकीय रजेचे वेतन काढून देण्यासाठी संदर्भ रुग्णालयात कार्यरत जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पाटील यांच्यासह आरोग्य सेवक संजय राव याचाही यात सहभाग होता. त्यांनी आरोग्य सेवक कैलास शिंदे यांच्यामार्फत १० हजाराची लाच स्वीकारली. यावेळी पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.