गोंदिया: गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनात खळबळ उडाली आहे.
भूषण विलास वाढोणकर (वय २३, वर्ष रा.अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. सदर तरुण डॉक्टर गेल्या काही दिवसापासून नैराश्यात होता आणि कुणाशी काहीही बोलत सुद्धा नव्हता, असे त्याच्या सोबत असणाऱ्या इतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सांगितले.भूषण हा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील इमारत क्रमांक 7 मध्ये तिसऱ्या माळ्यावरील डी 31 क्रमांकाच्या रूममध्ये राहत होता.सकाळी आपली ड्युटी करून सायंकाळी रूम वर आला.रूममधील सहकारी हा रात्रीची ड्युटी असल्याने आपल्या ड्युटीवर गेला.त्यानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत सहकाऱ्याने त्याला मोबाईलवर कॉल केला. मात्र, कॉलचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेजारील रूमच्या बाजूला असलेल्या रूममध्ये राहणाऱ्या मित्रांना कॉल करुन सांगितले असता त्यांनी रूम मध्ये जाऊन बघितले असता. भूषणने सिलिंग पंख्याला दोराने गळफास घेतल्याचे सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आले.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी घटनस्थळाला भेट दिली व वसतिगृहातील इतरांना विचारपूस केली.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवानंद मलगे यांनी सुरू केली आहे.