खि़डकीतून शिरून मंदिरातील दागिणे चोरणार्याला पोलिसांनी केले गजाआड

0
8

गोंदिया : शहर पोलिस ठाण्याअंतर्गत छोटा गोंदिया परिसरातील पांगोली नदीच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरच्या खिडकीतून आत प्रवेश करून हनुमानाचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपी पंकज मिल्कीराम सूर्यवंशी (२२, रा.मुंडीपार-खुर्द, बटाना) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शहर ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने केली आहे.

छोटा गोंदिया परिसरातील पांगोली नदीच्या काठावर महाकाल देवस्थानातील हनुमान मंदिरात भाविक पूजाअर्चा करण्यासाठी सोमवारी (दि.१८) सकाळी ६ वाजता गेले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसले. या चोरीसंदर्भात भाविकांनी पुजारी स्वप्नील पारधी माहिती दिली. त्यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता चांदीचे मुकुट, छत्र, चांदीचे डोळे ६ नग, चांदीचे मुख, चांदीचे नाक, चांदीचा टिका, चांदीच्या भुवया २ नग, हाताचे कडे २ नग असे एकूण ३५ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. यासंदर्भात शहर पोलिसांत भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करीत गुन्हे प्रकटीकरण पथकाने पंकज मिल्कीराम सूर्यवंशी याला अटक केली. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील, हवालदार जागेश्वर उईके, हवालदार कवलपालसिंग भाटिया, सुदेश टेंभरे, महिला हवालदार रिना चव्हाण, सतीश शेंडे, प्रमोद चव्हाण, दीपक रहांगडाले, शिपाई दिनेश बिसेन, मुकेश रावते, कुणाल चारेवार, अशोक रहांगडाले, सुभाष सोनवाणे यांनी केली आहे.

चोरी केलेली दुचाकीही जप्त
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या शहर ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस अंमलदारानी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पंकज सूर्यवंशी अटक केली. त्याच्याजवळून चोरी केलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. तसेच चोरी केलेली १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल क्रमांक एमएच ३५- ९९९८ हीसुद्धा जप्त करण्यात आली आहे. अशाप्रकारे दोन गुन्ह्यांतील ५० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तपास हवालदार सुदेश टेंभरे करीत आहेत.