खोटे सोने विक्री करणार्या तरुणांंचा खून,पाच आरोपींना केली अटक

0
7

गोंदिया,दि.20-: आम्हाला नकली सोना विक्री करून आमची फसवणूक करतो, असे म्हणत तीन तरूणांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका तरूणाचा खून करण्यात आला तर दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता डांगोर्ली येथे घडली.किशोर चुन्नीलाल राठौर (३० रा. गोंडीटोला, कटंगीकला ता. जि. गोंदिया) असे मृताचे नाव आहे. तर संदीप मदनलाल ठकरेले (२३) व देवदीप राजेंद्र जैतवार (१८) रा. हनुमान मंदीरचे मागे, गोंडीटोला, कटंगीकला अशी जखमींची नावे आहेत.

गोंदिया तालुक्याच्या गोंडीटोला कटंगीकला येथील संदीप ठकरेले, किशोर राठौर व देवदीप जैतवार हे तिघेही १८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मोटार सायकलने किशोर राठोड याच्याकडे असलेला नकली सोन्याचा झुमर विकण्याकरीता डांगोर्ली येथे गेले होते. आम्हाला नकली सोना विक्री करून आमची फसवणूक करता असे बोलून आरोपींनी त्या तिघांना मारपीट करुन जबरीने आपल्या मोटार सायकलवर बसवून मध्यप्रदेशच्या डोंगरगाव येथे नेले. देवदीप जैतवार याच्या जवळील ५ हजार रूपये बळजबरीने हिसकावून घेतले. काठीने बेदम मारहाण केल्यामुळे यात किशोर राठौर याचा मृत्यू झाला.

या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३८६, ३४१, १४३, १४४, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व रावणवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, रावणवाडीचे ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे, अंबुरे, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, रियाज शेख, सुमेंद्र तुरकर तुलसीदास लुटे, इंद्रजीत बिसेन, लक्ष्मण बंजार, संतोष केदार, विनोद गौतम यांनी कामगिरी केली आहे.

वेगवेगळे पथके केली होती तयार

रावणवाडी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तपासासाठी रवाना करण्यात आले होते. आरोपींना मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील वाराशिवनी येथे अटक करण्यात आली.

यांना केली अटक; आरोपी वाढण्याची शक्यता
या प्रकरणात ओमप्रकाश खिलेश्वर चौधरी (१८), अजय तुरकर (३५), शुभम उर्फ राजू दीपचंद ठाकरे (२३), अशोक ठाकरे (४०), आलोक बिसेन (२४) सर्व रा. कोसते, ता. वाराशिवनी, जिल्हा – बालाघाट (मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली आहे.