महागाव हत्याकांड : संघामित्राच्या बालमित्राने पुरविले ‘थॅलियम’, मुंबईतून विष खरेदी

0
5

गडचिरोली : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या महागाव हत्याकांडात कुंभारे कुटुंबातील सून संघमित्राला ‘थॅलियम’चा या जहाल विषाचा पुरवठा करण्यात साथ देणाऱ्या तिच्या बालमित्राला पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश ताजने (रा.खामगाव, जि.बुलढाणा) असे आरोपीचे नाव असून, त्यानेच मुंबई येथून हे विष खरेदी करण्यासाठी संघमित्राला मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

२० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येणाऱ्या महागाव येथील कुंभारे कुटुंबातील शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजया शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९, रा. गडअहेरी, ता. अहेरी), मावशी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे (५०, रा. बेझगाव, ता. मूल,) मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) या पाच जणांचा लागोपाठ आकस्मिक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा उलगडा झाल्यानंतर सून संघमित्रा कुंभारे आणि मामी रोजा रामटेके हिला अटक करण्यात आली होती. ‘थॅलियम’ नावाचे जहाल विष देत या दोघींनी हे हत्याकांड घडवून आणले. याप्रकरणी विषाचा पुरवठा करण्यात मदत करणाऱ्या अविनाश ताजने याला पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश हा संघामित्राचा बालमित्र आहे. आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी हे हत्याकांड उघडकीस आणले.

संघमित्रा कुंभारे व अविनाश ताजने हे शालेय जीवनापासून मित्र आहेत. सद्या तो हैद्राबाद येथे एका कंपनीत चौकीदार म्हणून कार्यरत आहे. संघमित्राचा रोशन कुंभारेशी विवाह झाल्यानंतर तिचा अविनाशशी काही दिवस दुरावा निर्माण झाला. परंतु मध्यंतरीच्या काळात संघमित्रा ही उपचारार्थ तिच्या माहेरी गेल्यानंतर पुन्हा ती अविनाश ताजनेच्या संपर्कात आली. तेव्हा तिने सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्याचे अविनाशला सांगितले. हळूहळू दोघांमधील संबंध वाढले आणि संघमित्राने सासरच्या मंडळींना ठार करण्याची योजना अविनाशला सांगून त्याची मदत मागितली. पुढे संघमित्राच्या सांगण्यावरून अविनाशने दोनवेळा विष खरेदी केले. त्यासाठी पैसेही त्यानेच दिले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.