महिला पोलिस कर्मचाऱ्याची पेटवून घेऊन आत्महत्या

0
30

अहेरी : अहेरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलिस शिपाई वैशाली गुलशन आत्राम यांनी आपल्या सासरी मुलचेरा तालुक्यातील कोपरअली येथे स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्यांचे पती हेसुद्धा पोलिस विभागातच कार्यरत असून त्यांची छोटी-छोटी दोन मुले पोरकी झाली आहेत.

वैशाली आत्राम यांची तीन महिन्यांपूर्वी प्रसुती होऊन त्यांना दुसराही मुलगाच झाला होता. त्या अजूनही प्रसुती रजेवर होत्या. त्यांचे पती अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात कार्यरत आहेत. सध्या रजेवर असल्याने वैशाली सासरी कोपरअली येथे मुलांसह राहात होत्या. अशातच गुरूवारी संध्याकाळी त्यांनी घराच्या मागच्या खोलीत जाऊन स्वत:ला पेटवून घेतले. जास्त प्रमाणात जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

यावेळी त्यांची दोन्ही मुले घरातील मंडळींकडे होती. २०१८ मध्ये वैशाली यांचा विवाह झाला होता. परंतू यावेळी दुसऱ्या प्रसुतीनंतर झालेल्या हार्मोन्सच्या बदलानंतर त्या दडपणात राहात होत्या. त्यातून त्यांची मानसिक स्थिती ठिक राहात नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे वैशाली यांचे वडीलही पोलिस विभागात कार्यरत होते, असे समजते. शुक्रवारी अंत्यसंस्कार केले असून माहेरच्या लोकांचे बयाण घेतल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. मुलचेरा पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.