पत्रकार दिनानिमीत्त लेख….‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सध्या बातमीदारी किंवा पत्रकारीता ही एका क्लिकवर आली आहे. त्यामध्ये सोशल मीडियामुळे तर क्रांतीच झाली आहे. त्यानंतर आतातर सिटीझन जर्नालिस्ट हा प्रकार अस्तित्वात आला आहे. मात्र माध्यमे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक त्यानंतर सोशल मीडिया या तिनही माध्यमातून जातांना अधिक वेगवान झाली आहेत. मराठीमध्ये माध्यमांच्या स्थित्यंतराचा अभ्यास करतांना बाळशास्त्री जांभेकर यांना विसरून चालणार नाही. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेध घेणार हा लेख…

         मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

         बाळशास्त्री हे इंग्रजी राजवटीतील एक विद्वान व्यक्तिमत्व म्हणून प्रख्यात होते. बालपणी घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केलेल्या बाळशास्त्रींनीं सन 1825 मध्ये मुंबई येथे सदाशिवबापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडून संस्कृत आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले. गणित आणि आधुनिक विज्ञान या विषयातही ते पारंगत होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सन 1834 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.

         बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला. त्यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांचे शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम उपलब्ध करून दिली. कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र अशा विविध विषयांचे बाळशास्त्री यांना ज्ञान होते.

          एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना समाजाकडे सजगतेने पाहणाऱ्या बाळशास्त्रींना अनेक समस्या दिसून येत. पारतंत्र्य, अनिष्ट रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्रय, अंध:श्रद्धा होणाऱ्या समाजाच्या अधोगतीमुळे त्यांना चिंता वाटत असे. या सर्व समस्यांमधून मार्ग दाखविण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता त्यांना जाणवली. त्यासाठी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.

          6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ‘दर्पण’ साडे आठ वर्षे चालले आणि जुलै 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

        ‘दर्पण’ या दैनिक वृत्तपत्रासोबत मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी 1840 साली सुरू केले. त्याचे स्वरूप शैक्षणिक होते. ‘दिग्दर्शन’ मधून ते आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे महारथी त्यांचे विद्यार्थी होते. ‘दिग्दर्शन’च्या कामात त्यांची मदत होती. या मासिकाचे संपादक म्हणून बाळशास्त्रींनी 5 वर्षे काम पाहिले. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढविण्याचा प्रयत्‍न केला.

         तत्कालीन पश्चिम बंगालमध्ये पहिले वृत्तपत्र सुरु झाले. मराठीत बाळशास्त्री जांभेकरांनी पुढाकार घेतला, त्यांच्या नावाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु झाली. त्या योजनेची थोडक्यात माहिती… पत्रकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर संस्थेच्या विश्वस्त मंडळाने शिफारस केल्यानुसार या योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठीचे निकष खालील प्रमाणे आहेत.

        वृत्तपत्र आणि इतर वृत्तप्रसार माध्यम संस्था यांचे संपादक, 30 वर्षे पत्रकार म्हणून काम केलेले व वय वर्षे 60 पूर्ण झालेले जेष्ठ पत्रकार. किमान सलग 30 वर्षे श्रमिक पत्रकार/ छायाचित्रकार म्हणून सेवा करुन सेवानिवृत्त झालेले व किमान 60 वर्षे वय पूर्ण झालेले पत्रकार/ छायाचित्रकार. किमान सलग 30 वर्षे स्वतंत्र व्यवसायी पत्रकार/ छायाचित्रकार म्हणून पत्रकारिता/ छायाचित्रकार म्हणून पत्रकारिता करुन निवृत्त झालेले व किमान 60 वर्षे पूर्ण झालेले स्वतंत्र व्यवसायी पत्रकार, छायाचित्रकार. किमान सलग 10 वर्षे अधिस्वीकृतीधारक असलेले पत्रकार व वयाची 60 वर्षे पूर्ण झालेला असावा.

         अधिस्वीकृतीधारक नसलेल्या पत्रकारांच्याबाबतीत अधिस्वीकृतीपत्रिकेसाठी असलेले निकष पूर्ण करीत असलेले पत्रकार यांचा योजनेसाठी विचार करण्यात येईल. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार समितीला असेल. ज्या पत्रकारांना इपीएफ योजना (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) व्यतिरीक्त इतर कोणत्याही स्त्रोतातून निवृत्ती वेतन किंवा निवृत्ती वेतनविषयक लाभ मिळालेले/ मिळत नसेल अशा पत्रकारांसाठीच ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लागु राहील. ज्येष्ठ पत्रकार म्हणजे ज्याची उपजिविका केवळ पत्रकारितेवर अवलंबून आहे आणि अन्य कोणत्याही नोकरी/व्यवसाय यामध्ये नाही/नव्हते असे जेष्ठ पत्रकार. गंभीर गुन्ह्यामध्ये दोषसिध्दी होवून शिक्षा झालेली आहे अशा पत्रकारांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नसेल.

         या योजनेसाठी ज्येष्ठ पत्रकार ज्या प्रसार माध्यमामध्ये पत्रकारिता करुन निवृत्त झाले त्या प्रसार माध्यमातील संबंधित वृत्तपत्र नियमित असावे. वृत्तवाहिनी असल्यास ती अधिकृत सक्षम प्राधिकाऱ्यांकडे नोंदणीकृत असावी. या योजनेसाठी लाभ घेऊ इच्छिणारा पत्रकार आयकर भरणारा नसावा. सदर सन्मान योजने अंतर्गत आर्थिक मदतीची रक्कम लाभार्थी हयात असेपर्यंत मिळेल. लाभार्थी पत्रकाराच्या मृत्यूपश्चात सदर सन्मान योजनेचा लाभ त्याच्या कुंटुबियास देय असणार नाही असे या योजनेचे स्वरुप आहे.

         –  कैलाश गजभिये  उपसंपादक,जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया