मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेला काळीमा! आठ महिला पोलीसांवर तीन वरिष्ठांकडून अत्याचार

0
16

मुंबई : पोलीस म्हणजे समाजाचे रक्षक. समाजात होत असलेल्या गुन्हेगारीला रोखणे हे पोलिसांचे पहिले कर्तव्य असते. पण हेच पोलीस गुन्हेगार झाले तर? मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातून असाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या घटनेने अख्खे पोलीस दल हादरले आहे. मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बलात्कार (Rape) करत असल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ देखील या अधिकाऱ्यांनी बनवल्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. एवढंच नाहीतर एक महिला पोलीस कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीने गर्भपात (Abortion) करण्यास देखील भाग पाडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे.महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करणारे पत्र पोलीस अधिकाऱ्यांना पाठवले आहे. आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे तसेच या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.