महावितरणच्या बाह्यस्त्रोत कर्मचा-याला मारहाण व शिविगाळ

0
4

नागपूर, दि. 25 जानेवारी 2024:- थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून दोन बाह्यस्त्रोत कर्मचा-यांनी एका बाह्यस्त्रोत कर्मचा-यास मारहाण आणि अश्लिल शिविगाळ केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महावितरणच्या न्यु सुभेदार शाखा कार्यालयातील बाह्यस्त्रोत तांत्रिक कर्मचारी विजय भालेराव यांनी 24 जानेवारी रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास वरिष्ठांच्या सुचनेनुसार रविंद्र बन्सोड या थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला. दरम्यान रात्री 9 च्या सुमारास ग्राहकाने थकबाकी भरल्याने विजय भालेराव याने  खंडित वीजपुरवठा पूर्ववत केला. यानंतर महावितरणच्या वाठोडा शाखा कार्यालयातील बाह्य स्त्रोत कर्मचारी समीर हांडे याने  विजय भालेराव यास फ़ोन करुन रविंद्र बन्सोड यांचा वीजपुरवठा खंडीत केल्याचा जाब विचारला आणि शारदा चौकात भेटायला बोलवले. तेथे समीर हांडे आणि मानेवाडा उपविभाग येथे कार्यरत बाह्यस्त्रोत कर्मचारी किशोर कुटरूंगे या दोघांनी वीजपुरवठा खंडित का केला असे विचारुन विजय भालेराव सोबत बाचाबाची करीत मारहाण आणि अश्लिल भाषेत शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विजय भालेराव याने समीर हांडे आणि किशोर कुटरूंगे याचेविरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कठोर कारवाईची सुचना
बाह्यस्त्रोत कर्मचा-याला बाह्यस्त्रोत कर्मचा-यांकडून झालेली मारहाण आणि अश्लिल शिविगाळ प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधीत प्रकरणाची योग्य चौकशी करुन दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची सुचना महावितरण प्रशासनाने संबंधित एजन्सी आणि कार्यकारी अभियंता यांना दिली आहे.