गडचिरोली : नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड जंगलात अनेक देशविघातक कारवायांची व्यूहरचना आखणारा जहाल नक्षलवादी मनोज उर्फ कोपा उसेंडी (७२ वर्षे) याचे आजारपणाने १५ मार्च रोजी निधन झाले. नक्षलवाद्यांनी त्याचा मृतदेह कांकेर जंगलात सोडला, त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांच्या परवानगीने परसलगोंदी (ता.एटापल्ली) येथे अंत्यसंस्कार केले.
मनोज हा वयाच्या १८ व्या वर्षीच नक्षल चळवळीत सामील झाला होता. छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात झालेल्या अनेक कारवायांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे. पोलीस चकमकीसह घातपाती कारवाया त्याच्या इशाऱ्यावर होत होत्या. त्याने नक्षल चळवळीत विविध पदांवर काम केले होते. त्याचा नक्षल चळवळीतील सर्वाधिक कार्यकाळ हा अबुझमाड येथे गेला. छत्तीसगडमधील अनेक कारवायांची व्यूहरचना आखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.वयोमानानुसार तो थकला होता. १५ मार्च रोजी त्याचे आजारपणाने निधन झाले. त्यानंतर माओवाद्यांनी त्याचा मृतदेह कांकेर जंगलात सोडला. कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांची परवानगी घेऊन मृतदेह परसलगोंदी येथे आणला. त्याच्यावर १६ मार्च रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.