प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले

0
13

नागपूर : दोन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यात प्रियकराचा चेहरा विद्रूप झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी तक्रारीवरून प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला. गणेश लक्ष्मण भोयर (२९) असे जखमीचे नाव आहे.

गणेशची दोन वर्षांपूर्वी शोभा नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांचे मधुर संबंध झाल्यानंतर तो तरुणीच्या घरी येऊन राहायला लागला. गेल्या वर्षभरापासन दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. गणेशला दारुचे व्यसन होते. तरुणीने त्याच्याकडे वेगळे राहण्यासाठी हट्ट केला. त्यामुळे तो त्याची आई यशोदा (५५,राहुल गांधीनगर झोपडपट्टी, चिखली वस्ती) हिच्यापासून वेगळा प्रेयसीसोबत रहायला लागला होता.

दोघेही गुलमोहर नगरला राहायला लागले. तेथे तरुणीचे काही मित्र येत असल्यामुळे तो नाराज होता. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडत होते. प्रेयसीला त्याने स्वत:च्या घरी राहण्यासाठी नेले. सुरुवातीला काही दिवस दोघेही आनंदात गेले. मात्र, गणेशसोबत ती नेहमी वाद घालत होती. तिच्या त्रासाला कंटाळून तो अनेकदा रस्त्यावर कुठेही झोपायचा. २५ एप्रिल रोजी कळमना भाजी मार्केटच्या जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ सायंकाळी पाच वाजता तो उभा असताना त्याच्या ओळखीचे नितीन, अमोल हे दुचाकीवर आले.दुचाकीवर मागे गणेशची प्रेयसी शोभा बसली होती. शोभाने गणेशच्या चेहऱ्यावर निळ्या रंगाचे द्रव फेकले. यात त्याचा चेहरा, छातीचा भाग जळाला. गणेशने आरडाओरड केल्यावर आरोपी फरार झाले. मात्र त्याच्या मदतीला कुणीही आले नाही. कळमना पोलीस ठाण्यातील पथकाने त्याला रुग्णालयात नेले. दीड तासांनंतर त्याच्या आईशी संपर्क करण्यात आला. त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याच्या आईच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसीची काही युवकांशी मैत्री होती. ती मैत्री गणेशला खटकत होती. त्यामुळेच प्रेयसीने त्याच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची चर्चा आहे.