जोशी ट्रेडर्समधील बटाटा-कांदा विक्री कार्यालयात चक्क देहव्यापार

0
14

नागपूर : आतापर्यंत ब्युटीपार्लर, स्पा, मसाज पार्लर, पंचकर्म केंद्र आणि सलूनमधेच देहव्यापार होत असल्याचे समोर आले होते. आता पहिल्यांदाच नागपुरात एका बटाटा-कांदा व्यापाऱ्याच्या कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शुक्रवारी दुपारी गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घालून दोन महिलांना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. फुले मार्केटमधील जोशी ट्रेडर्सचा मालक अजय जोशी यालाही अटक करण्यात आली.

जय महादेव जोशी (४२, रा. प्लॉट नं. २१, रामकृष्णनगर, उमरेड रोड, दिघोरी) याचे फुले मार्केटमध्ये जोशी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. जोशी हा कांदे-बटाट्याचा ठोक व्यापारी आहे. मात्र, त्याने कार्यालयातच देहव्यापार सुरू केला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी जोशीच्या दुकानात छापा घालण्यात आला. तेथे आरोपी दोन महिलांकडून देहव्यापार करवून घेताना आढळला.आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल, रोख १५ हजार ५०० रुपये व इतर साहित्य असा एकूण २५ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रमुख कविता इसारकर, हवालदार प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, अश्वीन मांगे, लता गवई आणि शेषराव राऊत यांनी केली.