जहाल माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

0
11

गडचिरोली,दि.२८ः शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 662 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज 28/05/2024 रोजी एकुण 06 लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी नामे गणेश गट्टा पुनेम वय 35 वर्ष रा. बेच्चापाल, तह. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.) याने सीआरपीएफचे पोलीस उप-महानिरीक्षक जगदीश मीणा यांच्या समोर आत्मसमर्पण केले.त्यानंतर त्यांनी त्याचे हस्तांतरण गडचिरोली पोलीस दलाकडे केले.

आत्मसमर्पीत जहाल माओवादी गणेश गट्टा पुनेम हा सन 2017 मध्ये सप्लाय टिम (भैरमगड एरीया) दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे जानेवारी 2018 पर्यंत कार्यरत होता.त्यानंतर सन 2018 मध्ये सप्लाय टिममध्ये उप-कमांडर पदावर बढती मिळाली.सन 2018 पासुन आतापर्यंत सप्लाय टिम उप-कमांडर (भैरमगड एरीया) पदावर कार्यरत होता.त्याच्यावर २ गुन्हे दाखल असून सन 2017 मध्ये मौजा मिरतूर, जि. बिजापूर (छ.ग.) जंगल परिसरात झालेल्या चकमक व सन 2022 मध्ये मौजा तिम्मेनार जि. बिजापूर (छ.ग.) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.

आत्मसमर्पणानंतर  पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गणेश गट्टा पुनेम याला एकुण 5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 14 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई सी.आर.पी.एफ. चे पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान)  जगदीश मीणा व गडचिरोली जिल्ह्राचे  पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उप-कमांडण्ट सीआरपीएफ नितिन कुमार यांच्या नेतृत्वाखाली आर.एफ.टी (रेंज फिल्ड टीम) च्या इंट सेल पथकाकडून करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल  यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.