गोंदिया, दि.28 : घाटकोपर, मुंबई येथे 13 मे 2024 रोजी जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडलेली आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व कालावधीत व अन्य कालावधीत होणाऱ्या दुर्घटनांमुळे जिवित हानी टाळण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष प्रजित नायर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन संबंधित अधिकारी/ विभागाने आपले कार्यअधिकार क्षेत्रानुसार पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमीत केले आहे.
शहरी, ग्रामीण भागातील व महामार्गावर लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांचे रचनात्मक (Structural Audit) तपासणी करावी. तपासणीअंती आढळून आलेल्या अवैध जाहिरात फलक निष्कासनांची कार्यवाही करुन संबंधितावर नियमानुसार कार्यवाही करावी. शहरी, ग्रामीण भागातील व महामार्गावर लावण्यात आलेल्या जाहिरात फलकाच्या आजुबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यात यावी. सार्वजनिक अथवा खाजगी जागेत कम्युनिकेशन नेटवर्ककरीता विविध कंपनीचे उभारण्यात आलेले मोबाईल टॉवर्स यांची रचनात्मक तपासणी करावी. जिल्हा/राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेले दिशादर्शक फलकांची रचनात्मक तपासणी करुन अनुपालन अहवाल सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.