दोन आरोपी अटकेत, दहा जून पर्यंत पोलिस कोठडी
आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी दिली तक्रार, अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
गडचिरोली (विष्णू वैरागडे) –आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत आदिवासी विकास वखार महामंडळाच्या गोडावुन मध्ये खरेदी केलेल्या ५९ हजार क्विंटल धानापैकी २८ हजार ४१५ धान केवळ २४० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे परस्पर विक्री करुन अफरातफरी करून फसवणूक केल्याने आदिवासी विकास महामंडळाचे केंद्र प्रमुख व्यंकटेश बुरले व प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्यावर आष्टी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा आज ता ६ जुनला ला दाखल करण्यात करुन अटक केली असून १० जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आदिवासी विकास महामंडळचे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्या तक्रारी वरून आष्टी पोलिस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ८१ अन्वये भादंवि ४०९,४२०,४६५ ,४६८ ४७१ (३४) अंतर्गत गुन्हा दाखल केला. असुन दोन आरोपींना अटक केल्यानंतर चामोर्शी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर एकुण ५९ हजार क्विंटल खरेदी केलेल्या धान प्रत्यक्षात चौकशी अंती २८ हजार ४१५ क्विंटल धान २४० रुपये प्रति क्विंटल दर प्रमाणे परस्पर विक्री करुन अपहार केल्याने बाजारभावाने जवळपास पाच कोटी ७९ लाखांचा धान्य अपहार केला आहे. यासोबतच ७१ लाख ३८ हजार बारदाना देखील अपहार केला असून जवळपास २३ लाख २७ हजार रुपये किंमतीची बारदाना परस्पर विक्री केली आहे. असा एकूण मुद्देमालासह ६ कोटी दोन लाखांचा धान्य व बारदाना परस्पर विक्री करुन अपहार केल्याने धान्य खरेदी केंद्र प्रमुख व्यंकटेश बुरले व प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार या दोघांना अटक केली आहे. यात आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसून हा धान्य कुणाला विकला या दिशेने तपास होण्याची शक्यता असुन सदर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्याने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.