समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची जोरदार धडक;बाप-लेकाचा जागीच मृत्यू

0
127

वाशिम:-समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाशिममध्ये महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये ३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर सकाळी ११.४५ वाजता भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे चालकाने महामार्गावर कडेला ट्रक उभा केला होता. याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील लोकेशन २१८ वर हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले.अपघातामध्ये ४५ वर्षीय वडील आणि ७ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले असून यामध्ये २ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अपघातग्रस्त कार नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती. अपघातामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा पुढील भाग कापून त्यानंतर मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.