मुंबई, दि. १५ ऑगस्ट: मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंताचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्यांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देउन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारात उत्कृष्ट स्वयंसेवक शहरी भागातून मयुर शेवाळे, दिपशिखा सिंह आणि ग्रामीण भागातून रोहन तांबडे व भक्ती पिसे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून शहरी भागातून कथीरेसन आणि ग्रामीण भागातून नितीन देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कक्ष म्हणून शहरी भागातून रामानंद आर्य डी.ए.व्ही. महाविद्यालय आणि ग्रामीण भागातून दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा सन्मान करण्यात आला. क्षेत्रीय समन्वयक म्हणून शहरी भागातून मोहम्मद गानी आणि ग्रामीण भागातून युवराज पाटील यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा समन्वयक म्हणून निखिल कारखानीस यांचा गौरव करण्यात आला. तर प्रजासत्ताक दिन संचालन शिबिर २०२४ यामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केल्याबद्दल संपदा मावळणकर यांना सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थी विकास विभागाच्या पुरस्कारात ५६ व्या सांस्कृतिक आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविल्याबद्दल आर. ए. पोदार महाविद्यालय आणि द्वितीय पारितोषिकासाठी मिठीबाई महाविद्यालयास गौरविण्यात आले. १८ व्या आंतरमहाविद्यालयीन अविष्कार संशोधन स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदासाठी बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी आणि द्वितीय पुरस्कारासाठी रामनारायण रुईया महाविद्यालय, निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स आणि विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांचा सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणाले, मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. परदेशातील अनेक नामांकित उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत. दुहेरी पदवी आणि सह पदवीच्या शिक्षणाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योन्मुख क्षेत्रातील गरजा व संधी लक्षात घेऊन अनेक संशोधनाचे क्षेत्र निवडून त्यावर काम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सेंटर फॉर एआय इन हेल्थ केअर सेंटरच्या स्थापनेसाठी आणि सेमी कंडक्टर मिशनसाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. तसेच भारतातील प्राचीन आणि समृद्ध भाषांचे जतन, संवर्धन आणि वृध्दीसाठीही योजना तयार केल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.अजय भामरे यांनी विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न अपेक्षित असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. मुंबई विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी विविध प्राधिकरणाचे मान्यवर सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.