नागपूरच्या बाल सुधारगृहातून फरार दोन बालकांना पकडले

0
65

गोंदिया : शहरात मागील ३-४ महिन्यांपूर्वी गोंदिया ते ढाकणीकडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे सुन्नी चौकी येथे अवैध शस्त्रानिशी दरोड्याच्या प्रयत्नात असलेला आरोपी राहुल जसवानी (रा.श्रीनगर, गोंदिया) याच्यासह पकडलेले दोन अल्पवयीन बालके नागपूरच्या बाल सुधारगृहातून २० नोव्हेंबर रोजी फरार झाले. गोंदिया शहर ठाण्याच्या डीबी पथकाने या दोन्ही बालकांना गोंदियात पकडले.

गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३१० (४) सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा, १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यातील आरोपींसोबत दोन १६ ते १७ वर्षे वयोगटातील विधीसंघर्ष बालके सुद्धा होते. त्यांना सुद्धा ताब्यात घेतले होते, तेव्हापासून ते बालसुधारगृह नागपूर येथे होते. त्यापैकी एक १७ वर्षीय विधीसंघर्षित बालक हा पोलिस ठाणे इमामवाडा नागपूर येथील चोरीच्या गुन्ह्यात बाल सुधारगृह नागपूर येथे बंद असलेल्या अन्य एका १६ वर्ष वयोगटाच्या विधीसंघर्ष बालकासोबत २० नोव्हेंबर २०२४ रोजी पळून गेले. बाल सुधारगृह नागपूर येथून फोनद्वारे पोलिस ठाणे गोंदिया शहर येथे माहिती देण्यात आली. त्या अनुषंगाने पोलिस ठाणे गोंदिया शहर येथील पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक हे पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना २१ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन्ही बालकांना पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, डीबी पथकाचे पोलिस हवालदार जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटिया, सुदेश टेंभरे, सतीश शेंडे, निशिकांत लोंदासे, दीपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, महिला पोलिस हवालदार रिना चव्हाण, पोलिस शिपाई दिनेश बिसेन, सुभाष सोनवाणे, मुकेश रावते, कुणाल बारेवार व अशोक रहांगडाले यांनी केली आहे.

त्या बालकांवर नागपूरच्या कपिलनगर येथे गुन्हा दाखल
बाल सुधारगृह नागपूर येथून पळून आलेल्या गोंदिया येथील विधीसंघर्ष बालक १७ वर्ष हा अन्य एका मुलासोबत सुन्नी चौकी ते कुंभारेनगर गोंदियाकडे येणाऱ्या रोडवर फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोलिस ठाणे कपिलनगर नागपूर येथे गुन्हा दाखल असल्याने दोन्ही विधीसंघर्ष बालकांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.