अमरावती : येथील अकोली परिसरातील स्मशानभूमीजवळ गुरूवारी एका व्यक्तीचे शीर धडावेगळे करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी पोलिसांसमोर मृताची ओळख पटविणे आणि आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. अखेर या प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उलगडले. उसणे दिलेले पाच लाख रुपये परत करण्यासाठी तगादा लावल्याने आरोपीने या व्यक्तीची हत्या केली. धड तेथेच टाकून शीर पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा सैन्यदलात कार्यरत आहे. दुर्योधन बाजीराव कडू (६३. रा. भूगाव, ता. अचलपूर) असे मृताचे तर, निकेतन रामेश्वर कडू (२९, रा. भूगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.
अकोली येथील स्मशानभूमीनजीक शेतातील तारेच्या कुंपणाजवळ शीर नसलेला मृतदेह २८ नोव्हेंबर रोजी दुपारी आढळून आला होता. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.शीर नसल्याने मृताची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मृताच्या पायजामाच्या खिशात सूर्य छाप भस्कापुरी तंबाखूची पुडी आणि चुन्याची हिरवी डबी आढळली. त्यावरून पोलिसांनी तो तंबाखू कुठल्या भागात खाल्ला जातो, उत्पादन कुठले, याचा शोध घेतला. त्या तंबाखूच्या पुडीवर मेड इन परतवाडा असे नमूद होते. पोलिसांनी ग्रामीण नियंत्रण कक्षाला त्याबाबत माहिती दिली. बेपत्ता देखील शोधले. त्यावेळी दुर्योधन कडू हे गुरुवार सकाळपासून घरून बेपत्ता झाल्याची तकार सरमसपुरा ठाण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोलीस पोहोचले. तेथून निकेतनचा सुगावा लागला. निकेतन व दुर्योधन कडू हे गुरुवारी सकाळी भूगाव येथे सोबत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी निकेतनला संशयावरून ताब्यात घेतले. दुर्योधन कडू यांचे शीर येथील अकोली रोड भागात सत्तुराने धडावेगळे करून ते आसेगाव पूर्णा येथील पूर्णा नदीच्या पात्रात फेकल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेतला. टाकरखेडा पूर्णा नजीक पुलाच्या काठावरील बंगाली बाभुळवनातून मृताचे धडावेगळे केलेले शीरदेखील ताब्यात घेतले. निकेतनने दुर्योधन यांच्याकडून पाच लाख रुपये उसणे घेतले होते. काही दिवसांपासून दुर्योधन यांनी निकेतनकडे पैशांसाठी तगादा लावला होता. त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपण त्यांना गुरुवारी अमरावतीत आणले व त्यांचे शीर धडावेगळे करून त्यांची हत्या केल्याची कबुली निकेतनने पोलिसांना दिली. आरोपीने हत्येसाठी अकोली परिसर का निवडला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.