424 रक्तदात्यांनी रक्तदानाचे केले पुण्यकार्य

0
70
गोंदिया-जिल्ह्यातील नक्षलग्रस्त प्रभावित भागात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना नक्षली हल्ल्यात शहीद झालेले पोलीस दलातील पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार त्याचप्रमाणे मुंबई शहर येथे आंतकी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी, अंमलदार, निष्पाप नागरिक यांच्या स्मृती प्रित्यर्थ 424 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, आमगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे, रोहिणी बानकर, विवेक पाटील, साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात 26 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील जिल्हा वाहतूक शाखा, पोलिस उपमुख्यालय देवरी, आमगाव पोलिस, तिरोडा पोलिस, सालेकसा पोलिस, अर्जुनी मोरगाव पोलिस, डुग्गीपार पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या शिबिरात जिल्हा वाहतूक शाखेचे 39, देवरी पोलिस उपमुख्यालयाचे 78, आमगाव पोलिस स्टेशनचे 76, अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशनचे 44, सालेकसा पोलिस स्टेशनचे 82, तिरोडा पोलिस स्टेशनचे 34 व डुग्गीपार पोलिस स्टेशनचे 71 अश्याप्रकारे जिल्ह्यातील 424 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात पोलिस दलातील अधिकारी, अंमलदार, सामान्य नागरिक, युवक युवती, एचडीएफसी बँकेच्या कर्मचार्‍यांचा समावेश होता. आयोजनासाठी एचडीएफसी बँकेचे दीपक पाटील, सुमित करमनकर, डॉ. पल्लवी चौरागडे, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया येथील चेतन चव्हाण, रंजना मेश्राम, खुशबू चांदेकर, पल्लवी पटले, सचिन सावरकर, रोहित बागडे, यांनी परिश्रम घेतले.