उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य केलेल्या महिला पोलिसाला अटक;ओरोसमधून घेतले ताब्यात

0
483

कोल्हापूर :-करणी केल्याची भीती घालून नागरिकांना लुबाडणाऱ्या भोंदू महाराजाच्या टोळीतील सदस्य पाेलीस कर्मचारी तृप्ती संजय मुळीक (वय ३४, सध्या रा. ओरस, ता. कुडाळ, जि.सिंधुदुर्ग, मूळ रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) हिला अटक केली आहे. जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि. ११) तिला ओरस येथून अटक केली. गंगावेशीतील सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७) यांना करणी काढण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ७० हजारांची लूट करणाऱ्या टोळीत तिचा सहभाग होता.

कोकणातील दादा महाराज पाटणकर याने फिर्यादी कुलकर्णी यांना त्यांच्या कुटुंबावर जवळच्याच एका व्यक्तीने करणी केल्याची भीती घातली. करणी काढण्यासाठी काळी जादू करण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी ३ ऑक्टोबरला गुन्हा दाखल होताच, जुना राजवाडा पोलिसांनी टोळीतील सदस्य शशिकांत नीळकंठ गोळे (वय ६९, रा. बारामती, जि. पुणे) आणि कुंडलिक शंकर झगडे (वय ३८, रा. जेजुरी, जि. पुणे) या दोघांना अटक केली होती. या गुन्ह्यात एका महिला पाेलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास करून संशयित पोलिस कर्मचारी तृप्ती मुळीक हिचा पोलिसांनी शोध घेतला. गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने बुधवारी ओरसला जाऊन तिला ताब्यात घेतले. ती मूळची दरवेश पाडळी येथील आहे. अधिक तपास सुरू असल्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचे केले सारथ्य

तृप्ती मुळीक हीची २०११ मध्ये सिंधुदुर्ग पोलिस दलात चालक पदावर भरती झाली. तिने डिसेंबर २०२१ मध्ये सिंधुदुर्गमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारचे सारथ्य केले होते. या घटनेनंतर ती चर्चेत आली होती.

पुण्यात चोऱ्या करणारा अटकेत

जैन साधकांचा वेष परिधान करून जैन मंदिरात घुसून चोऱ्या करणाऱ्या एकाला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. त्याने पुण्यासह राज्यातील घाटकोपर वाई, चिखली, डोंबिवली अशा ठिकाणी देखील चोऱ्या केल्याची माहिती समोर आली असून, पैशांची चणचण भासत असल्याने चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून सव्वा चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नरेश आगरचंद जैन (वय ४५, रा. बोम्बे चाळ, सी.पी. टैंक गिरगाव, व्ही. पी. रोड, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरिक्षक युवराज नांद्रे, पोलीस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, कुंदन शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे.