सिहोरा पोलिसांची कारवाई ;14 लाखाची सुगंधित तंबाखू जप्त;5 इसमावर गुन्हा दाखल

0
16

आंतरराज्य बपेरा सिमेवरील प्रकार
तुमसर,दि.२३ डिसेंबरः-मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्याा सीमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या बपेरा चौकीवरील नाकाबंदी दरम्यान शनिवार 21 डिसेंबरच्या मध्य रात्री सिहोरा पोलिसांनी 14 लाख 19 हजार 200 रुपयाची सुगंधित तंबाखू जप्त करीत ५ जणांवर गुन्हा दाखल केला.पोलीस स्टेशन सिहोराचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर यांचे पथकाने नाकाबंदी दरम्यान रात्री 9 च्या सुमारास ही कारवाई केली.या कारवाईमुळे सुगंधित तंबाखू विक्रेते, पान मसाला व गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
मध्य प्रदेशातून अवैध साहित्याची आयात करण्यात येत असल्याची कुण कुण सिहोरा पोलिसांना लागताच त्यांनी सापडा रचला व मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची बपेरा आंतरराज्य सीमेवर कसून तपासणी करण्यात आली असता यात पाचही आरोपी अडकले व त्यांच्या वाहनातून सुगंधित तंबाखू ताब्यात घेण्यात आली. मध्य प्रदेशातून अवैध साहित्याची आयात महाराष्ट्रात करण्यात येत आहे. याच अनुषंगाने सीमेवर वाहनाची तपासणी करण्यासाठी पोलिस चौकीची पक्की व सुसज्ज इमारतीचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनावर नियत्रंण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर यांनी सुंगधित पान मसाल्याची खेप जप्त करण्यासाठी पथक गठित केले होते. या पथकात सहायक पोलिस उपनिरीक्षक हरिराम सूरपाम, राजू साठवणे, तिलक चौधरी, नीलेश गजाम, महेश गिन्हेपुंजे, संतोष सिदने व गजानन तिरकाडे यांचा समावेश करण्यात आला आहे. वाहन क्रमांक एमपी 50 जी 1659 चारचाकी वाहन दाखल झाले. या वाहनात असणाऱ्या पोत्याची चौकशी करण्यात आली. या पोत्यात सुगंधित पान मसाल्याची मोठी खेप दिसून आली. सुंगधित पान मसाल्याची आयात करीत असलेले राहुल अशोक प्रजापती (29), आकाश मनोज कळपती (20), शनी राजेंद्र वाढीवे (19) सर्व रा. वाराशिवनी, श्याम सेठ रा. बालाघाट (मध्यप्रदेश) आणि रोहीत हरिप्रसाद पांडे रा. तुमसर यांच्या विरोधात पोलीस स्टेशन सिहोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.