चंद्रपूर : मूल तहसील कार्यालयासमोर रितिक शेंडे (२८) या युवकाची शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार युवकांनी हत्या केली. शहरात तीन महिन्यातील ही दुसरी हत्येची घटना आहे. शुक्रवारी रात्री मूल पोलीस ठाण्यात नागरिकांनी एकत्र येत आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली. शनिवारी शवविच्छेदनानंतर संतप्त नागरिकांनी मूल तहसील आणि पंचायत समितीजवळील घटनास्थळी मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक खोळंबली. दरम्यान, शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी आरोपी राहुल पासवान याच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे, तर अन्य फरार आहेत.