गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीतून परराज्यातील रेतीची होत असलेली अवैध वाहतूक यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी देलेल्या निर्देशानुसार देवरी पोलिसांनी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर सिरपूर चेकपोस्टवर केलेल्या नाकाबंदीत 9 ब्रास रेतीची अवैध वाहतूक करीत असलेला ट्रक पकडला. ही कारवाई 20 जानेवारी रोजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा नोंद करून त्याच्या ताब्यातून ट्रकसह 35.54 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
छत्तीसगड राज्यातील अवैध वाळूची जिल्ह्याच्या हद्दीतून तस्करी होत असल्याची माहिती देवरी पोलिसांनी मिळाली. या आधारे देवरी पोलिसांनी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलीस अधीकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात सोमवारी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर येथील तपासणी नाका चौकात नाकाबंदी कारवाई केली. यावेळी राजनांदगाव (छ.ग.) कडुन देवरी मार्गे नागपुरकडे जाणार्या ट्रक क्र. एमएच 30 बीटी 6575 यास थांबवुन ट्रकची तपासणी केली. त्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आशिष देवराव वानखेडे, (27) रा. पिप्री. ता. आकोट, जि. अकोला व मालक अमय अतुलराव म्हैसने (29) रा. गजानननगर आकोट, ता. अकोट, जि. अकोला यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून 35 लाख रुपये किमतीचा ट्रक व 54 हजार रुपयांची 9 ब्रास रेती 35 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास देवरीचे ठाणेदार प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मानिक पुरी करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार बोपचे, पोलिस नायक कांदे, पोलिस शिपाई इंगळे यांनी केली.