स्कूल व्हॅन उलटून चाैदा विद्यार्थी जखमी

0
355

नहरटोला-बिबीटोला मार्गावरील घटना; चालकाला अटक
गोंदिया ः सेजगावकडून काचेवानीकडे निघालेली स्कूल व्हॅन उलटून चाैदा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. ३०) सकाळी नऊच्या सुमारास नहरटोला ते बिबीटोला मार्गावर घडली. या प्रकरणी गंगाझरी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे.
काचेवानी येथील आदीशक्ती पब्लीक स्कूलची स्कूल व्हॅन (एमएच ३५/ ए. जे. १७५०) घेऊन चालक सुनील श्रीबान्सरी (वय २७, रा. पालडोंगरी) हा गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी निघाला. दरम्यान, तेरा विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये टाकून तो सेजगावकडून काचेवानीकडे जात होता. यावेळी सकाळी नऊच्या सुमारास नहरटोला ते बिबीटोला मार्गावर व्हॅनचालक सुनील श्रीबान्सरी याचे व्हॅनच्या स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटले आणि व्हॅन उलटली. यात सर्व चाैदाही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. जखमींवर एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर सुटी देण्यात आली. व्हॅनमध्ये नर्सरी ते चाैथीपर्यंतचे विद्यार्थी होते. या घटनेची नोंद गंगाझरी पोलिसांनी केली असून, आरोपी चालकाला अटक केली आहे. जखमींपैकी दोन विद्यार्थ्यांच्या डोक्याला इजा झाल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

जखमी विद्यार्थ्यांची नावे
सान्वी जितेश अंबुले, अक्षित जितेश अंबुले (दोघेही रा. बिबीटोला), सिवन्या अजय भगत, दाक्षी गोविंदकुमार रहांगडाले, रिनल रहांगडाले (तिघेही रा. सोनेगाव), क्रिश कृष्णा रहांगडाले (रा. डिब्बेटोला), मेहान भगत, शिवम मेश्राम, तोषांत जागेश्वर रहांगडाले, गुंजन अरविंद रहांगडाले, रिनल सुभाष रहांगडाले, लक्ष कृष्णकुमार पटले, आदी अरुण बोपचे, भावी भरतलाल रहांगडाले (सर्व रा. सोनेगाव) अशी जखमींची नावे आहेत.