तुमसर,दि.०९ः तुमसर-रामटेक राज्यमार्गावरील धोप बसस्थानकाजवळ लग्न आटोपून स्वगावाकडे निघालेल्या वर-वधूच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजतादरम्यान घडली.या अपघातात मृत पावलेल्या बहिणीचे नाव अंकिता मनोज प्रभाकर (३६),रा.हट्टा ता.बालाघाट असे आहे.भरधाव चारचाकी वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला उलटली. यात कारमधील नवरदेवाच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला. तर वर-वधूसह चालक व अन्य एक महिला जखमी झाले.जखमींना तुमसर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमींमध्ये वर सचिन नरेंद्र प्रभाकर (३८), वधू शिल्पा सचिन प्रभाकर (३४), कारचालक मनोज नरेंद्र प्रभाकर, तिन्ही रा.हट्टा व मंजुषा सुनीलदास वैष्णव (४२) रा.पांढुर्णा (मध्यप्रदेश) अशी जखमींची नावे आहे. बालाघाट जिल्ह्यातील हट्टा येथील सचिन प्रभाकर या तरुणाचे शिल्पा नामक तरुणीशी नागपूर येथे लग्न आटोपले. लग्न आटोपून वराकडील मंडळी चारचाकी वाहन क्र.एमएच ३१ एफआर ५८५५ या कारने स्वगावाकडे निघाले.दुपारी २ वाजतादरम्यान कारचालक मनोज प्रभाकर याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने धोप बसस्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला कार उलटली. त्यात नवरदेवाच्या बहिणीचा करुन अंत झाला. अपघात घडताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आले.