९.८६७ किलो ग्रॅम गांजा जप्त
गोंदिया : जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पोलिस अॅक्शन मोडवर आली आहे. त्यानुरूप जिल्हाभरातील पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांकडून धाडसत्र राबविले जात आहे. त्यातच गांजा तस्करी होत असल्याची खात्रीशिर माहिती (Gondia police) पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन ठिकाणी सापळा रचून गांजा तस्करी करणार्या चार जणांना जेरबंद केले. ही कारवाई ६ मार्च रोजी आमगाव व डुग्गीपार पोलिसांनी केली. मोहनलाल साधुजी बघेले (५०) रा.सितेपार, कार्तिक शिवेंद्र कवरे (२०) रा.डुंडा आदित्य ब्रम्हानंद धनविजय (२२) रा. खैरीदिवान जि.भंडारा व विनय खुशाल बारापात्रे (२१) रा.आंधळगांव जि.भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सविस्तर असे की, जिल्ह्यातील अवैधधंदे व व्यवसायावर आळा घालण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांनी दिले आहेत. त्यानुरूप जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांकडून धाडसत्र राबवून गुन्हेगार प्रवृत्तींच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. त्यातच ६ मार्च रोजी जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री पटवून स्थानिक गुन्हे शाखा, डुग्गीपार पोलिस पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून धाड कारवाई केली. या कारवाईत मोहनलाल साधुजी बघेले रा.सीतेपार याच्या घरी धाड टाकण्यात आली.
दरम्यान घराची झडती घेतली असता साठवून ठेवलेला ६ किलो ८८६ ग्रॅम गांजा किंमत १ लक्ष ३७ हजार ७२० रुपये चा जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे डुग्गीपार पोलीस पथकाने डुंडा-पांढरी फाट्यावर सापळा रचून कार्तिक शिवेंद्र कवरे, आदित्य ब्रम्हानंद धनविजय व विनय खुशाल बारापात्रे या तिघांना गांजा वाहतूक करताना पकडले. दरम्यान त्यांच्याकडून २ किलो ९८१ ग्रॅम गांजा किंमत ५९,६२० रुपये, एक मोटर सायकल तसेच इतर साहित्य असा एकूण १ लक्ष १५ हजार ३२० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही घटनाती आरोपीविरूध्द संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या निर्देशान्वये गुन्हे शाखेचे पोनि दिनेश लबडे, डुग्गीपारचे पोनि मंगेश काळे यांचे मार्गदर्शनात सपोनी बांबोळे, पोउपनि शरद सैदाने, पोहवा राजू मिश्रा, भुवन देशमुख, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश पाटील, राम खंदारे, अग्निहोत्री, जगदीश मेश्राम, रणजीत भंडारकर, हरिणखेडे, इंगळे, खोब्रागडे यांनी केली.