उपसरपंचाने साडी घालून फोडल्या घागरी…

0
34

तुमसर- तालुक्यातील परसवाडा व लगतच्या सहा गावातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावचे उपसरपंच पवन खवास यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. अनेक वेळा अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही समाधानकारक उपाय न झाल्याने त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयासमोर साडी घालून आणि घागर फोडत प्रशासनाच्या अनास्थेचा तीव्र निषेध केला.

उपसरपंच पवन खवास यांनी यापूर्वीही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना थेट मुंबईत जाऊन निवेदन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आंदोलन करताना लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास संपूर्ण गावकऱ्यांसह जल प्रादेशिक कार्यालयावर मटकी फोडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. या आंदोलनाच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, हेमंत बंधाटे आणि ग्रामपंचायत सदस्य रोडगे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन ठोस पावले उचलते का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.