नागपूर: नागपूर जिल्ह्यातील बूटीबोरी येथे उड्डाणपुलावरून महिंद्रा ७०० कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बूटीबोरी – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बूटीबोरी येथील टी-पॉईंटवर घडला. नागपूर – हैदराबाद नॅशनल हायवे आणि बुटीबोरी – तुळजापूर हायवेवरील टी-पॉईंटजवळ हा उड्डाणपूल आहे.नागपूरकडे येताना, चालकाने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेने गाडी वळवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती बूटीबोरी पोलिसांनी दिली.
या अपघातात अरिंजय अभिजित श्रावणे(१८) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण अक्षता अभिजित श्रावणे*ही गंभीर जखमी झाली आहे. नागपूरच्या सदर परिसरातील गांधी चौकात राहणारे सक्षम बाफना, हिमांशू बाफना आणि मानस बदानी (वय सुमारे २० वर्षे) हे तिघे होळी निमित्त गेट-टुगेदरसाठी वर्धा येथे गेले होते.परत येताना त्यांनी अरिंजय आणि त्याची बहीण अक्षता यांना वर्धेतून सोबत घेतले. वर्ध्याहून नागपूरकडे येताना, कार चालवणाऱ्या त्यांच्या मित्राने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर गाडी वळवली. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यानंतर चालक गोंधळला आणि भरधाव वेगातील कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून सुमारे २० फूट खाली कोसळली.अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते, अशी माहिती बूटीबोरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांनी दिली. या अपघातातील जखमींना नागपूरच्या किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.